• कोल्हापूर, महाराष्ट्र
  • ०२३२४ २४४०४४, २४४०४३
  • vikaskpatil@gmail.com

परिचय

'सर्वसामान्य जनतेचा विकास म्हणजेच देशाचा खरा विकास' हे ब्रीद मानून समाजाच्या भल्यासाठी अथक झटणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे मा. आमदार के. पी. पाटील. समाजातील विविध क्षेत्रात संपूर्ण विकास साधला जावा यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेऊन त्या प्रश्नांना वाचा फोडणारा, त्यावर आवश्यक त्या उपाययोजना अमलात आणणारा नेता लोकांना 'आपला' नेता वाटतो. आपल्या सर्वसमावेशक व जनतेशी थेट संपर्क साधण्याच्या वृत्तीमुळे 'जनसामान्यांचे सशक्त व्यासपीठ' अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

बालपण, शिक्षण व व्यवसाय

०९.०६.१९४६ रोजी आऊताई परशराम पाटील व ह. भ. प. परशराम बाळाजी पाटील या माता-पित्यांच्या पोटी के. पी. पाटील यांचा जन्म झाला. शालेय शिक्षणानंतर त्यांनी कोल्हापूर मधील राजाराम कॉलेजमधून बी.ए चे शिक्षण पूर्ण केले. शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असल्यामुळे लहानपणापासून शेतीकाम व शेतीशी संबंधित इतर कामांशी त्यांची जवळून ओळख झाली. घरच्या शेतीचाच व्यवसाय त्यांनी पुढे नेला. समाजसेवेची परंपरा घरामध्येच असल्याने विद्यार्थी दशेत असतानाच त्यांना समाजकारणाची आवड निर्माण झाली.

KP Patil

समाजकारण व राजकारण

मा. शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांचा के. पी. पाटील यांच्यावर सुरुवातीपासूनच विशेष पगडा राहिला आहे. त्यांना आदर्श मानून वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी के. पी. पाटील यांनी समाजकारण व राजकारणामध्ये प्रवेश केला. युवक कॉग्रेस, फादर कॉग्रेस, पक्षाचे संघटनात्मक काम, पक्षसवंर्धनाचे काम यात त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनाकाळात कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण अध्यक्ष पदाची धुरा त्यांनी सांभाळली.

सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक हा नेहमीच के. पी. पाटील यांचा स्थायीभाव राहिला आहे. निवडणुकीतील यशापयश मोजण्यापलीकडे जाऊन जनसेवा हाच त्यांनी धर्म मानला. आपल्या मतदारसंघासाठी, तेथील वाड्या-वस्त्यांसाठी विशेष निधी मिळवत त्यांनी तेथे विकास घडवून आणला. दळणवळण, सिंचन, आरोग्य, पाणी, तीर्थक्षेत्र, इयतिहासिक स्थाने, पर्यटन, अशा अनेक योजना त्यांनी प्रभावीपणे राबविल्या. समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.बळकट सहकार

चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या श्री. दूध. वेद. सह. साखर कारखाना लि. बिद्री ता. कागल चे संचालक पद ते चेअरमन पद व त्यानंतर बिद्रीचे नेतृत्व असा के. पी. पाटील यांचा यशस्वी प्रवास घडला. आपल्या कार्यकाळात त्यांनी बिद्रीला उर्जितावस्था प्राप्त करून दिली. २० मॅगावॅट क्षमतेचा सहवीज प्रकल्प उभारणे व या प्रकल्पाच्या मार्फत कारखान्यास आर्थिक सक्षमता त्यांनी मिळवून दिली. हुतात्मा वारके सह. सुतगिरणीची स्थापना हा प्रकल्प बिद्री येथे अद्योगिक विकासाचे पर्व आणणारा ठरला. सुमारे २४ हजार चाती (स्पिंडल) असणारा हा प्रकल्प म्हणजे पारदर्शक कारभार व अव्वल गुणवत्तेचे उदाहरण ठरला आहे. या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधीही निर्माण झाल्या. सहकारी साखर कारखानदारीतला अभ्यासू नेता अशी त्यांची दृढ ओळख घडली आहे.शैक्षणिक कार्य

सामान्य विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे व त्याद्वारे त्यांची उत्तम प्रगती व्हावी यासाठी के. पी. पाटील यांनी सन १९९० मध्ये मुदाळ येथे श्री. बाळूमामा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली व त्यायोगे माध्यमिक शिक्षणाचा पाया घातला. यानंतर उच्च माध्यमिक, डी.एड, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी व पदविका, अकॅडमी असे शिक्षणाचे अनेक पर्याय येथे सुरू करत येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे उघडी करून दिली. आज स्थानिक विद्यार्थ्यांसह बाहेरूनही अनेक विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. मुदाळचा त्यांनी घडविलेला शिक्षण पॅटर्न आज जिल्हाभर व राज्यभर आदर्श ठरला आहे.